मुखपृष्ठ Top News तपशिलाची खात्री झाल्यानंतर आर.सी. बाफना ज्वेलर्सकडे दागिने सुपूर्द

तपशिलाची खात्री झाल्यानंतर आर.सी. बाफना ज्वेलर्सकडे दागिने सुपूर्द

by sitemanager

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान एका वाहनात आढळलेल्या सोने, चांदी व हिऱ्याच्या दागिने मिळून आले होते. त्याच्या तपशीलाची खात्री झाल्यानंतर सदर मौल्यवान वस्तू शुक्रवार दि. २६ एप्रिल रोजी आर.सी. बाफना ज्वेलर्सकडे सुपूर्द करण्यात आल्या. या वस्तूंच्या वजनाविषयी निर्माण झालेला संभ्रम पाहता त्यांचे वजन २७ किलो नाही तर २१ किलो असल्याची माहिती बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आर. सी. बाफना ज्वेलर्स येथे शनिवार दि. २७ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शहरातील अन्य सराफ व्यावसायिकांचे सोने, चांदी, हिरे व इतर मौल्यवान वस्तूंची ने-आण करण्याचे काम सिक्वेल लॉजिस्टीक कंपनीमार्फत केले जाते. त्यानुसार गेल्या आठवड्यात दि. २० एप्रिल रोजी मुंबई येथून या कंपनीचे वाहन (एमएच १२, व्हीटी ८६२९) सोने, चांदी, हिरे घेऊन येत असताना कुसुंबा नाकाजवळ प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर यांच्या पथकाने तपासले.

त्या वेळी त्यात आढळलेल्या मौल्यवान वस्तूविषयी वाहनातील डिलिव्हरी असिस्टंटने माहिती दिली. मात्र कागदपत्रांची तपासणी अथवा अधिकची चौकशी न करता सदर वाहन एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा केले होते. त्यानंतर जळगावातील व पाठोपाठ नाशिक येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाफना ज्वेलर्सच्या दालनात चौकशी केली होती. त्यात सर्व तपशील जुळल्याने सर्व नियमानुसार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांची खात्री झाली. त्यानंतर सदर वाहन पोलिस ठाण्यातून सोडण्यात आले व सदर मौल्यवान वस्तू बाफना ज्वेलर्सकडे सुपूर्द करण्यात आल्या. या मौल्यवान वस्तूंचे वजन २७ किलो नव्हे तर २१०५५.४५० ग्रॅम असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तसेच गेल्या पन्नास वर्षांपासून रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सची वाटचाल ही बाफनाजींच्या आदर्शावर सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या