मुखपृष्ठ Top News देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल २७ व २८ जानेवारीला

देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल २७ व २८ जानेवारीला

by sitemanager

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी जळगावात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे संपन्न होत आहे. या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. चित्रपट विषयक प्रदर्शनी, शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग, मास्टर क्लास, चर्चासत्र, ओपन फोरम, टुरिंग टॉकीज तसेच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांसह उद्घाटन व समापन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी हा महोत्सव रंगणार आहे.

यंदा महोत्सवाचे ३रे वर्ष असून संपूर्ण राज्यातून या महोत्सवासाठी १०० हून अधिक शॉर्टफिल्म सहभागी झाल्या आहेत. निवडक ६० शॉर्ट फिल्मचे अधिकृत प्रदर्शन या दोन दिवसीय महोत्सवात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण लघुपट, माहितीपटांची मेजवानी मिळणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या परिसराला चित्रतपस्वी भालजी पेंढारकर चित्र नगरी असे नाव देण्यात आले आहे तर स्क्रिनींग सभागृहांना पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे व पद्मश्री ना. धों. महानोर यांचे नाव देण्यात आले आहे.

महोत्सवाची सुरुवात फिल्म बिसाउ कि मुक रामायणने प्रभा अत्रे सभागृहात प्रदर्शित करण्यात येईल या नंतर महोत्सवात सहभागी निवडक ६० चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. दुपार सत्रात चित्रपट रसिकांसाठी ‘चित्रपट रसग्रहण’ या विषयावर भारतीय चित्र साधनाचे राष्ट्रीय सचिव, चित्रपट अभ्यासक अतुल गंगवार यांचा मास्टर क्लास होणार आहे. तर तरुणांसाठी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांचा ‘कथा निवड व दिग्दर्शन’ या विषयावर मास्टर क्लास होईल. सायंकाळी ४:३० वा. कुलगुरू डॉ.व्ही. एल. माहेश्वरी, अशोकभाऊ जैन, डॉ.भरत अमळकर, चित्रपट अभ्यासक अतुल गंगवार, अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमासह उद्घाटन होईल. सायंकाळी ७ वा. टुरींग टाकीज या सत्रात लहान मुलांचे भावविश्व समृद्ध करणारा चित्र आर्या द डॉटर ऑफ भारत चे प्रदर्शन तसेच निर्माता दिग्दर्शक यांचेशी खुला संवाद कार्यक्रम होणार आहे. दि.२८ रोजी फिल्म स्क्रिनींगसह दिग्दर्शक नितीन भास्कर आणि निर्माता शरद पाटील यांचा युवा फिल्म मेकर्ससाठी मास्टर क्लास होईल. दुपार सत्रात प्रसिद्ध संगीतकार रोहित नागभिडे युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्षाचे औचित्य साधुन चित्र तपस्वी भालजी पेंढारकर दिग्दर्शित मराठा तितुका मेळवावा ही महोत्सवाची क्लोजिंग फिल्म प्रदर्शित केली जाईल. संध्याकाळी ५ वा. महोत्सवाचे समापन सत्र होणार आहे. याप्रसंगी रा.स्व. संघाचे प्रांत सहकार्यवाह स्वानंद झारे, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, प्र. कुलगुरू डॉ. एस.टी. इंगळे, उद्योजक प्रकाश चौबे, अॕड. सुशील अत्रे उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म, कॅम्पस फिल्म, माहितीपट यांना सामुहिक तसेच वैयक्तिक पारितोषिके वितरित करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून तयारी अंतिम टप्यात आली आहे. हा संपूर्ण महोत्सव नागरिक, चित्रपट क्षेत्रात करियर करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोफत असणार आहे. मास्टर क्लासमध्ये उपस्थित युवकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या दोन दिवसीय महोत्सवाचा जळगावकर नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

0 टिप्पणी
0

related posts

एक टिप्पणी द्या